सोलापुरातील या महत्वाच्या मागणीसाठी सरसावले आमदार देवेंद्र कोठे ; हजारों विद्यार्थ्यांची सोय होणार
सोलापूर : सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु व्हावे याकरिता आमदार देवेंद्र कोठे यांनी सकारात्मक पाठपुरावा सुरू केला आहे. मंगळवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुंबई येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश दिले.
२०१६ साली राज्य सरकारने सोलापूर, लातूरसह अन्य सहा ठिकाणच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. याबाबतचा सोलापूर तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून शासनाकडे सादर झालेला प्रस्ताव प्रलंबित आहे. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनची ३४ एकर जागा असून सुसज्ज इमारत, तज्ञ प्राध्यापक आणि पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. सोलापूर शहरात कष्टकरी, विडी कामगार, यंत्रमागधारक कामगार, वस्त्रोद्योग कामगार व मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या संख्येने राहतात. त्यांचे पाल्य हुशार व मेहनती असूनसुद्धा सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा खर्च श्रमिकांना तसेच मध्यमवर्गीयांना परवडणारा नाही. त्यामुळे सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होणे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यावश्यक असून महाराष्ट्र शासनाने याबाबत केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत. तसेच येत्या जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी केंद्राकडून परवानगी मिळवावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आणि याबाबत सोलापुरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठीचा निर्णय आपण लवकरच घेऊ असे आश्वासित केले.
आमदार देवेंद्र कोठे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेऊन याबाबत मागणीचे निवेदन दिले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे याकरिता मी स्वतः पाठपुरावा करीन. तसेच याबाबत तांत्रिक निर्णय घेणाऱ्या दिल्लीस्थित एआयसीटीई कडेही महाराष्ट्र शासनाकडून मी स्वतः दिल्ली येथे जाऊन पाठपुरावा करेन, असे आश्वासनही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अनुकूल असल्याने लवकरच याबाबत मंत्रिमंडळात चर्चा होऊन पुढील सकारात्मक कार्यवाही होईल असा विश्वास आहे. सोलापुरातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्च दर्जाचे अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे यासाठी मी कटिबद्ध आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य