२१ संस्थांतील ३ हजार ५०० गरजूंची दिवाळी झाली गोड : केतन वोरा मित्र परिवार आणि उद्योगवर्धिनीचा उपक्रम
सोलापूर :आपल्यासारखीच दिवाळी समाजातील गरजूंनीही साजरी करावी या हेतूने शुक्रवारी जणू सामाजिक जाणीवेचे हजारो दीप उजळले. केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनीतर्फे २१ संस्थांतील ३ हजार ५०० वंचितांना फराळ वाटप करण्यात आला.
जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील बी. सी. बॉईज हॉस्टेल जवळील उद्योगवर्धिनी संस्थेत हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ उद्योजक रंगनाथजी बंग, उद्योजक इंदरमल जैन, उद्योजक मेहुल पटेल, भारतीबेन पटेल, डॉ. आशिष भुतडा, उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, केतन वोरा उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २१ सामाजिक संस्थांकडे तब्बल ३ हजार ५०० जणांचा दिवाळी फराळ सुपूर्द करण्यात आला. स्वआधार संस्था, बी. सी. गर्ल्स हॉस्टेल, कतारी वस्ती, प्रार्थना फाउंडेशन, रॉबिन हूड आर्मी, हबीबा संस्था, आई संस्था, ब्रिजधाम वृद्धाश्रम, बी. सी. बॉईज हॉस्टेल, आधार संस्था आदी २१ संस्थांमधील गरजू मुले, अनाथ मुले, आधार नसलेले ज्येष्ठ नागरिक, पालावरच्या शाळा अशा गरजूंना दिवाळी फराळ देण्यात आला. बुंदीलाडू, चकली, करंजी, अनारसे, शेव, चिवडा, शंकरपाळी असे जिन्नस असलेला फराळ या गरजूंना देण्यात आला.
यावेळी रंगनाथजी बंग म्हणाले, समाजातील गरजूंचा आधार बनून वंचितांना सन्मानित करण्याचा उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आपल्या आनंदात समाजातील गरजूंना सहभागी करून घेण्याची ही प्रथा कायम राहणे आवश्यक आहे, असेही बंग याप्रसंगी म्हणाले.
उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान म्हणाल्या, आपण अत्यंत आनंदात आणि उत्साहात दिवाळीचे आनंद पर्व साजरे करत असताना समाजात आपल्या सोबत राहणारे गरजू, वंचितांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेणे आपले कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून केतन वोरा मित्र परिवार आणि उद्योगवर्धिनीतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे.
केतन वोरा म्हणाले, केतन वोरा मित्र परिवार आणि उद्योगवर्धिनीकडून गेल्या पाच वर्षांपासून वंचितांना फराळ देण्याचा उपक्रम सुरू आहे. यंदा हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या उपक्रमाव्यतिरिक्त दत्तक घेतलेल्या १७ विद्यार्थिनींचा शैक्षणिक तसेच घरगुती खर्च, गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देणे, वैद्यकीय मदत, शेकडो वंचितांना भोजन देणे असे उपक्रम वर्षभर राबविले जातात, असे केतन वोरा यांनी याप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमास रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव जयेश पटेल, कुशल देढीया, नंदकुमार आसावा, वासुदेव बंग, केतन वोरा, कल्पेश जव्हेरी, धिरेन गडा, आनंद जोशी, अशोक छाजेड, राजू वोरा, हर्षल कोठारी आणि उद्योगवर्धिनी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविक तर राजू वोरा यांनी आभार प्रदर्शन केले.