सोलापुरात काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर फेकले भोपळे, भेट दिल्या मिरच्या
सोलापूर – अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर तसेच पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या पॅकेजबाबत उघडपणे टीका केली. त्यांच्या या वास्तववादी वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या, तर मुख्यमंत्री आणि भाजपचे भाडोत्री ट्रोलर यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज सोलापूर शहरातील फोटफाडी चौकातील भाजप शहर कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी टरबुज आणि भोपळा फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.
सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले, “धरणांमधून योग्य नियोजनाशिवाय अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. हीच वस्तुस्थिती खासदार प्रणिती शिंदे यांनी धैर्याने मांडून शासनाचा नाकर्तेपणा उघड केला. त्याचबरोबर पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या सत्य परिस्थितीमुळे भाजपला मिरच्या झोंबल्या आणि म्हणूनच ते प्रणिती ताईंवर टीका करत आहेत. त्याच निषेधार्थ आम्ही आज भाजप कार्यालयासमोर टरबुज व भोपळा फोडून त्यांना प्रतीकात्मक ‘मिरच्या भेट’ दिल्या.”
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या फसव्या धोरणांचा आणि नाकर्तेपणाचा निषेध नोंदवला.
या आंदोलनात सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, विवेक कन्ना, सागर उबाळे, संजय गायकवाड, महेंद्र शिंदे, सुभाष वाघमारे, सचिन पवार, यासीन शेख, आदित्य म्हमाणे, अभिजीत डोलारे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.