सोलापुरात या मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला ! तीन पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने तणाव, परिस्थिती नियंत्रणात
सोलापूर : एम आय एम, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने निर्माण झालेला तणाव नियंत्रणात आणत पोलिसांनी बापूजी नगर इथल्या शाळेच्या मतदान केंद्रावर बंदोबस्त वाढवला. त्यामुळे याठिकाणी आता शांततेत मतदान सुरू झाले.
एमआयएमचे उमेदवार फारुक शाब्दि, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार तथा उमेदवार आडम मास्तर हे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी आल्याने तसेच शास्त्रीनगर परिसरातील बापूजी प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी प्रचंड मोठी रांग लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
त्यातच एमआयएमच्या एका कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने तणाव अधिकच वाढला. याची माहिती मिळताच स्वतः पोलीस आयुक्त एम राजकुमार हे पोलिसांच्या ताफ्यासह या ठिकाणी दाखल झाले. पोलीस येताच सर्व राजकीय नेते तिथून निघून गेले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावून त्या ठिकाणी मतदान सुरू करण्यात आले आहे.
स्वतः पोलीस आयुक्त कर्मचाऱ्यांच्या मोठ्या ताफ्यासह आल्याने या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली अन्यथा काहीही घडू शकले असते.