सोलापुरात देशमुख- कल्याणशेट्टी यांचे मनोमिलन ; आमचे बापू का दूर बाबा !
सोलापूर : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो, अशा काही राजकीय घडामोडी घडतात किंवा राजकीय समीकरणे तयार होतात की, एकमेकांच्या मित्र सुद्धा राजकारणात शत्रू बनतात. सोलापूर भाजपच्या राजकारणात एकाच पक्षातील ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कधीही जमले नाही.
कल्याणशेट्टी हे आमदार सुभाष देशमुख समर्थक मानले जात होते त्यामुळे विजयमालकांनी त्यांना कधी जमवून घेतले नाही. सोलापुरात बाजार समितीच्या निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली एकाच पक्षात असून एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख एकत्र झाले. तेव्हापासून सुभाष देशमुख आणि कल्याणशेट्टी यांच्यात प्रचंड दुरावा निर्माण झाला.
पण काशी पिठाची जगद्गुरु शिवाचार्य यांच्या दर्शनाला गेल्यानंतर जगद्गुरु यांनी आमदार विजयमालक आणि आमदार सचिन दादा यांना एकत्रित बसवत त्यांच्या दोघांच्या गळ्यात एकच हार घातला. दोघांनी एकमेकांना प्रसाद भरवला. त्यामुळे कुठेतरी हा दुरावा कमी झाल्याचे पाहायला मिळाले. यातच अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे विजयी झाले. त्या प्रीत्यर्थ कल्याणशेट्टी यांनी विजयकुमार देशमुख यांच्या सोलापुरातील कार्यालयात जाऊन मालकांची भेट घेत त्यांचा सत्कार स्वीकारला.
सचिनदादांचे मालकांसोबत तुटलेले नाते योगायोगाने जुळू लागले आहे. दादा अन् बापू मधील दुरावा सुद्धा अशाच काही योग घडून कमी व्हावा अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.




















