सोलापुरात भाजपच्या महिला आघाडीला धक्का ; शेकडो महिलांचा एमआयएम पक्षात प्रवेश
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. सोलापूर शहर मध्यचे एमआयएम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी व त्यांच्या पक्षाने कात टाकली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात फारूक शाब्दी व त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. एमआयएमने सोलापुरात भाजपला धक्का देत मुसंडी मारत शेकडो महिलांचा एमआयएम पक्षात प्रवेश घडवून आणला आहे.
बिलकीस सय्यद या भारतीय जनता पार्टीत होत्या. ऐन विधानसभा निवडणूका अगोदर बिलकीस सय्यद आणि त्यांच्या सोबत अनेक महिलानी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी प्रगती लॉन्स या ठिकाणी बिलकिस सय्यद यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर फारूक शाब्दी, अब्दुला डोनगावकर, अश्फाक बागवान, बिलकिस सय्यद, मोहसिन मैनदर्गीकर, राजा बागवान, याकूब शेख, एजाज बागवान, रवींद्र पाटील, कोळी, असिफ सय्यद आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बिलकिस सय्यद या भाजपच्या अल्पसंख्याक महिला सेलच्या अध्यक्षपदी अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या. फारूक शाब्दी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया मजलिसए ईत्तीहाद उल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात प्रवेश केला आहे. प्रगती लॉन्स या ठिकाणी झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात शेकडो महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ सोडून एमआयएमची पतंग हातात घेतली आहे.