सोलापुरात भाजपच्या आमदारांची ‘दिशा ‘ चुकली ; आम्हाला काय त्याचे !
सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयात घेण्यात आली. या समितीला इंग्रजीमध्ये दिशा असा शॉर्ट फॉर्म आहे.
केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा आढावा या महत्त्वाच्या बैठकीत घेतला जातो. पण भाजपच्या एकाही आमदाराने या बैठकीला उपस्थिती लावली नाही तब्बल दोन वर्षानंतर होणारी दिशा समितीची सभा भाजपच्या आमदारांनी चुकवली.
समितीचे अध्यक्ष प्रणिती शिंदे, सहअध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह माढयाचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदार राजू खरे, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे उपस्थित होते.
सहअध्यक्ष खासदार ओमराजे निंबाळकर हे ऑनलाईन जॉईन होते.
बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, रोहयो उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, यासह केंद्र सरकारच्या योजनांशी निगडित सर्वच विभागाच्या अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिशा समितीची सभा ही शहरात असतानाही शहरातले आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे यापैकी एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता. सर्वच भाजपच्या आमदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
मोदी सरकारच्या नववर्षेपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचे मार्केटिंग करताना दिसून आले परंतु त्याच केंद्र सरकारच्या योजनांची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात काय आहे याची माहिती घेण्यासाठी मात्र भाजपच्या आमदारांना गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळाले.