“जयकुमारजी गोरे तुम्ही वारीत नवा बेंचमार्क केला” ; CM देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
पंढरपूर : पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्यावतीने आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ‘निर्मल दिंडी’ तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रम आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्यवारी’ उपक्रमाच्या समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गोरे यांच्या आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांना दिलेल्या सेवेचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले, वारकऱ्यांची सेवा ही मोठी संधी असून वारीचे चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन वारीचे अतिशय उत्तम नियोजन केले. वारकऱ्यांना जर्मन हँगरच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था, महिलांकरीता स्वच्छतागृहासह स्नानगृह, पायाचे मसाज अशा आवश्यक त्या सर्व सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला, नवीन उंची गाठत एक उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे यावर्षीच्या वारीचे वेगळेपण पहायला मिळत आहे. सेवा कधीच संपत नसते, सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात. याकरिता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.
गोरे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावी, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये, याकरिता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था, विश्वस्त आदी घटकांनी अहोरात्र कामे करत मनोभावी सेवा करीत आहे. वारकऱ्यांकरिता पालखीतळावर सुविधा देण्याच्यादृष्टीने जर्मन हँगरसह, वैद्यकीय सुविधा, महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहे, मसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वारी दरम्यान प्रशासनाच्यावतीने केलेल्या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे श्री. गोरे म्हणाले.
जंगम म्हणाले, ‘निर्मल दिंडी’ उपक्रमाअंतर्गत सुमारे ११ हजार शौचालय, १५५ हिरकणी कक्ष, स्तनदा माताकरिता हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन, लहान बालकांकरिता खेळणी वस्तू आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या कामाकरिता सुमारे १ हजार २३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही श्री. जगंम म्हणाले.
यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, तसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता काम केलेल्या अधिकारी, सेवाभावी संस्था, कार्यकर्त्याचा तसेच आरोग्यवारी उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या संस्थांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, देवेंद्र कोठे, विक्रम पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते.