अनगर मध्ये राजन पाटलांचे निर्विवाद वर्चस्व, उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ; प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील अनगर च्या पहिल्या नगराध्यक्षा; ; बाळराजे यांनी अजित पवारांना हिणवले!
सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये राजन पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. त्यांच्या 17 जागा या कालच बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुक ही नगराध्यक्ष पदासाठी होईल अशी शक्यता होती कारण उज्वला थिटे पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
उमेदवारी अर्ज छाननी वेळी उज्वला थिटे पाटील यांचा अर्ज बाद झाला. कारण त्या अर्जावर सूचक याची सही नव्हती असे समोर आले आहे. त्यामुळे पूर्वीच 17 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या अनगर नगरपंचायतीमध्ये आता नगराध्यक्ष पद सुद्धा राजन पाटील यांच्याकडे गेल्याने अनगर मध्ये प्रचंड उत्साह, जल्लोष आणि दिवाळी साजरी करण्यात आली.
स्वतः माजी आमदार राजन पाटील यांनी ही जल्लोषात सहभागी होऊन त्यांनी दंड थोपटल्याचे पाहायला मिळाले. या जल्लोषा दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवार यांना हिणवताना “अजित पवार, सगळ्याचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही” असे म्हणून चॅलेंज दिल्याचे दिसून आले.
उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील या नगरच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
दरम्यान उमेश पाटील यांनी या प्रकरणावर असा संताप व्यक्त करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत त्या विरोधात आम्ही न्यायालयात जाण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.


















