शिवपुरी येथील श्री अग्निमंदिराचे बुधवारी भूमिपूजन ; अग्निहोत्र दिनाचे औचित्य : ४ एकरात साकारणार मंदिर
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी येथे उभारण्यात येणाऱ्या श्री अग्निमंदिराचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ८ वाजता डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
१२ मार्च हा अग्निहोत्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांना त्यांच्या श्रेष्ठ सद्गुरूंकडून पूर्णाभिषेक दीक्षा (त्रिपुरी विद्या) मिळाली होती. त्यामुळे १२ मार्च रोजी श्री अग्निमंदिराचे भूमिपूजन होणार आहे.
चार एकर परिसरात सुमारे तीन वर्षात उभारण्यात येणारे हे श्री अग्निमंदिर अग्निहोत्राचे जगातील प्रमुख केंद्र राहणार आहे. या श्री अग्निमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या श्री अग्निमंदिरात अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही विधी होत नाही. या श्री अग्निमंदिराचा परिसर शांततामय राहणार असून येथे दुसरा कोणताही शब्द उच्चारला जाणार नाही. त्यामुळे या वातावरणात भावातील ध्यानाचा अनुभव घेता येऊ शकेल, असे श्री. कुलकर्णी याप्रसंगी म्हणाले.
जगभरातील मलेशिया, जर्मनी, पोलंड, चीन अशा ६० देशांमधील नागरिक अग्निहोत्राशी परिचित असून ते नित्य अग्निहोत्र करतात. सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनीही स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला नित्य अग्निहोत्र करावे आणि वातावरण शुद्धीसह मनशांतीचा लाभ घ्यावा. तसेच बुधवारी (दि. १२) होणाऱ्या श्री अग्निमंदिराच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहनही एस. के. कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले.
या पत्रकार परिषदेस विश्व फाउंडेशनचे विश्वस्त नाना गायकवाड, मोहन डांगरे, राहुल डांगरे, योगेश डांगरे उपस्थित होते.