पुन्हा मीच आलोय ! सोलापूर झेडपीच्या ‘जलजीवन ‘ला सुनील कटकधोंड शिवाय पर्याय नाहीच, गाडेकर म्हणाले, मला पदमुक्त करा
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी पुन्हा उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार सोपविला आहे. यापूर्वी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपाभियंता संतोष गाडेकर यांनी माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केल्यानंतर आव्हाळे यांना हा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती मिळाली.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत चालणाऱ्या जलजीवन मिशन योजनेत अनियमितता असल्याने त्याची चौकशी झाली त्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी याची चौकशी लागली. कोळी यांच्याबरोबरच उप अभियंता कटकधोंड यांची ही चौकशी सुरू होती. कोळी यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार द्यायचा कुणाकडे? असा विषय होता. 189 कामाच्या फायलींचा गोंधळ अशा परिस्थितीमध्ये कटकधोंड यांनी पदभार घेऊन मागील पाच महिने जिल्ह्याचे अकरा आमदार त्यासोबत अनेक स्थानिक नेत्यांना सांभाळून कामकाज केले आहे. काम करताना काही जणांचा विरोधही त्यांनी स्वीकारला परंतु जलजीवनची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे पाहायला मिळाले. शेवटी चांगल्या कामाचे बक्षीस नाही तर त्यांची चौकशी चालू असल्याने सीईओ आव्हाळे यांनी त्यांचा पदभार काढला होता.
आव्हाळे यांनी 31 ऑगस्ट 2023 रोजी कटकधोंड यांचा पदभार काढला होता. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रवीण पाटील यांची नियुक्ती झाली ते सुद्धा केवळ चार महिने राहिले. त्यांनीही पदभार सोडला. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संतोष गाडेकर यांची नियुक्ती झाली. परंतु ते सुद्धा जास्त काळ टिकले नाहीत. त्यांनी स्वतःहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र देऊन माझा अतिरिक्त कार्यभार कमी करण्याची मागणी केली होती. शेवटी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सांभाळून जलजीवनचा गाडा हाकणारे सुनील कटकधोंड लकी ठरले आहेत. त्यामुळे सीईओ आव्हाळे यांनी जलजीवनची जबाबदारी कटकधोंड यांच्यावर सोपवले असून त्यांनी पदभार घेतला आहे.