राम सातपुते पुरावे दिलात ना चहाचे मळे तुमच्या नावावर करू ; आता तोंड आवरा नाही तर….
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुतेंना विकासाच्या मु्द्यावर घेरले आहे. तर दुसरीकडे सातपुतेंकडून सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापूरच्या विकासात योगदान नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरून आता काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सुशीलकुमार शिंदेंच्या कामाचा लेखा जोखा मांडत सातपुतेंना तोंड आवरण्याचा इशारा दिला आहे.
राम सातपुते यांनी निवडणुकीचा प्रचारा दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या विकासात कसलेच योगदान दिले नसल्याची टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून असंघटीत कामगारांना 15 हजार घरे दिली असल्याचा उल्लेख केला. तसेच सुशीलकुमार शिंदे यांचे दक्षिण अफ्रिकेत चहाचे मळे असल्याचा आरोपही सातपुतेंकडून आपल्या प्रचारादरम्यान केला जात आहे. यावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी जोरदार आणि मुद्देसुद प्रत्युत्तर दिले आहे.
चेतन नरोटे म्हणाले की, राम सातपुते यांनी शिंदे साहेंबावर टीका करण्यापूर्वी थोडा अभ्यास करायला हवा, कामगारांच्या घरकुलाच्या प्रश्नावर टीका करण्यापूर्वी सातपुतेंनी जाणून घ्यायला हवे होते, की सोलापूरमध्ये कामगारांसाठी घरकुल योजना ही सर्वात प्रथम १९८२ मध्ये काँग्रेसच्या काळात सुरू झाली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसचे तत्कालीन खासदार गंगाधर कुचन यांच्या प्रयत्नातून 5000 घरांचा प्रकल्प या ठिकाणी साकारण्यात आला. त्यानंतर युपीए सरकारच्या काळात आदरणीय सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते तब्बल 10000 घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार साहेब यांच्या प्रयत्नातून कामगारांना घरे देण्याची योजना मार्गी लागली होती. अशा प्रकारे 15000 घरे काँग्रेस सरकारच्या काळात झाली असल्याचेही आठवून करून दिली.
तसेच राम सातपुते यांनी टीका करताना शिंदे सांहेबांचे दक्षिण अफ्रिकेत चहाचे मळे असल्याचा आरोप केला आहे. त्यांचा हा आरोप म्हणजे जगातील आठवे आश्चर्य असल्याचा टोलाही नरोटे यांनी सातपुते यांना लगावला. तसेच जर खरेच शिंदे साहेबांचे चहाचे मळे असतील तर त्याचे पुरावे सादर करावे, ते मिळाले तर ते मळे तुमच्या नावावर करून घ्या असा टोलाही त्यांना लगावण्यात आला. याशिवाय ज्या शिंदे साहेबांवर तुम्ही पट्टेवाला म्हणून टीका करत आहात, त्याच शिंदे साहेबांना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी युनोमध्ये देशाची भूमिका मांडण्यासाठी पाठवण्याचा सन्मान केला होता. त्यामुळे अशा नेत्यांवर तुम्ही टीका करत असाल तर तुम्ही तोंड आवरा असा इशाराही नरोटे यांनी यावेळी दिला.