शहर मध्य मधील हिंदू संघटना एकवटल्या ; राम सातपुते यांना मताधिक्य देण्याचा निर्धार
सोलापूर : मोदींना पुन्हा राजसत्तेवर बसवण्यासाठी शहर मध्य मधून मोठे मताधिक्य मिळवून देणार असा संकल्प शेकडो युवकांनी केला. जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे..’ असा संकल्प करून धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्यावतीने ‘कार्य संकल्प मेळावा’ घेण्यात आला. या मेळाव्यात शेकडो युवक सहभागी झाले होते.
देव, देश आणि धर्म सुरक्षित रहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा राजसत्तेवर बसले पाहिजेत. यासाठी शहर मध्य मतदारसंघातून सर्वात मोठा मताधिक्य देण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला. निलम नगर येथील मातोश्री सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.
अंबादास गोरंटला म्हणाले, आजची लोकसभा निवडणूक एक धर्मयुद्ध आहे. या धर्मयुद्धात आपण प्रत्येकांनी सहभागी होऊन आपले योगदान द्यायचे आहे. माझ्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, माझा देव, देश, धर्म सुरक्षित राहण्यासाठी, माझी माता-भगिनी सुरक्षित राहण्यासाठी आपले एक मत प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हिंदुत्वासाठी मतदान करावे, असे आवाहन अंबादास गोरंटला यांनी केले.
याप्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रविकुमार बोल्ली, हिंदुराष्ट्र सेना शहर प्रमुख रवि गोणे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, हिंदुराष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे, मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे, राष्ट्रतेज न्यूजचे उपसंपादक हणमंतू श्रीराम, मार्कंडेय जनजागृती संघाचे शेखर राचर्ला, मार्कंडेय एम. आर संघटनेचे निखिल इट्टम आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर आरगोंडा यांनी केले.