भर पावसात कृषिमंत्री भरणे मामा शेतकऱ्यांच्या भेटीला ; जोडीला होते राजन पाटील अन् उमेश पाटील
सोलापूर : “सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिन्याअखेरीस पर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. तसेच प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याकरीता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी ३९३.७९ कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच येत्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतक-यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा करु असेही म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव व मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना सूचनादेखील दिल्या आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात सर्वत्र जास्त पाऊस पडल्याने नुकसान ही वाढलं आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सर्व परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे. सरकारने यावपूर्वीच २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. पंचनामे पूर्ण होतील तशी मदत जाहीर होईल. या संकट काळात केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी काल केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र देखील देण्यात आलं आहे. तसंच, आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदीनाले, ओढे, पूल अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केलं.
सीना नदीची वहनक्षमता ५० हजार क्युसेकची असताना सुमारे दोन लाख क्युसेक इतकं पाणी नदी पात्रातून वाहिल्यानं सीना नदीनं पात्र सोडलं आहे. त्यामुळे थेट माढा व मोहोळ तालुक्यातील गावे आणि शिवारांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड हानी झाली आहे.पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीत, तूर, ऊस, मका यांसारख्या पिकांचे नुकसान, जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांची झालेली हानी, रस्ते व पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत कृषी मंत्री भरणेंना माहिती दिली. यावर गांभीर्यानं लक्ष देत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा. शेती, गुरं, विहिरी या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
मंत्री भरणे म्हणाले की, “सीना व भीमा नदीला आलेल्या महापूरानं जिल्ह्यातील १२९ गावांना पाण्यानं वेढा घातलेला आहे. ऑगस्टमध्ये ६ तर सप्टेंबरमध्ये ११ तालुक्यातील ८७७ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामध्ये द.सोलापूर,उ.सोलापूर,बार्शी,अक्कलकोट,मोहोळ,माढा,करमाळा,पंढरपूर,सांगोला,माळशिरस व मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे. तसेच या दोन्ही महिन्यात एकूण ४ लाख २८ हजार १०७ शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. तसंच, कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही.” ते सोलापुरात नुकसाग्रस्त भागाच्या पाहणीदारम्यान बोलत होते.
सोलापूरला पुढील 2 दिवस रेड अलर्ट
सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अत्यंत विदारक परिस्थिती आहे. प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले असून गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, नद्यांना पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.