सोलापूर : पत्रकारांनी विकासाचे व्हिजन समोर ठेवूनच पत्रकारिता करावी. प्रशासन जिथे चुकेल तिथे नक्की सांगावे परंतु बातमीतून प्रश्न मांडण्यासोबतच उत्तरेही द्यावी त्याचा निश्चितच स्वीकार करू अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मी जोपर्यंत सोलापुरात आहे तोपर्यंत सोलापूरच्या विकासासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन अशी भूमिका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडली.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने झेडपी बीटवरील पत्रकारांचा सन्मान सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आव्हाळे यांनी यावेळी बोलताना मी जर आयएएस झाले नसते तर नक्कीच राजकारणात गेले असते असे सांगून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातूनच विकास होत असतो असा त्यामागील उद्देश त्यांनी बोलून दाखवला.
त्याचवेळी एका पत्रकाराने मॅडम तुम्ही आयएएस चा अनुभव घेतला आता राजकारणात जाणार का? असे म्हणताच “अरे बापरे,नको तो विषय” असे शब्द त्यांच्या तोंडून आले याचवेळी उपस्थित पत्रकारांमध्ये ही एकच हशा पिकला. दरम्यान पत्रकारांनी ही आयएएस ची परीक्षा एकदाच पास करावी लागते परंतु राजकारण्यांना दर पाच वर्षाला दिव्य परीक्षेला सामोरे जावे लागते असे सांगून पुष्टी दिली.