सोलापूर, दि. 19, (जि. मा. का.) : शासकीय योजनांविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, ग्राहकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे तसेच ग्राहकांना आपल्या हक्काबाबत जागरुक करण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहायक आयुक्त (अन्न ) सु. जिंतुरकर, कार्यकारी अभियंता रमेश राठोड, आशिष मेहता, उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतुक शाखा, बीएसएनएल, राज्य परिवहन विभाग, कृषी विभाग यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यंदा शासकीय सुट्टी असल्याने दि. 24 ऐवजी ग्राहक दिन मंगळवार, दि. 26 डिसेंबर 2023 रोजी बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीची संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना असल्याचे श्री. सरडे यांनी सांगितले.
संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या विभागाशी संबधित योजनांची माहिती स्टॉल मांडून नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी तसेच योजनांमध्ये साम्य असलेले स्टॉल शेजारी ठेवण्याच्या सूचना श्री. सरडे यांनी दिल्या. यावेळी बैठकीत प्रत्येक विभागाच्या समस्या व नवीन संकल्पना जाणून घेतल्या. जिल्हास्तरीय ग्राहक दिन यशस्वी करण्यासाठी नवीन संकल्पनांचे अवलोकनही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
000