जयकुमार गोरेंचा पाठपुरावा ; अरण तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास १५० कोटीचा निधी
माढा तालुक्यातील अरण येथील श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी या तीर्थक्षेत्राच्या १५० कोटीच्या विकास आराखड्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे त्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण या तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकसित करण्याची घोषणी केली होती.
त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांमार्फत “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देण्यात आला असून सदर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा” या नवीन योजनेस मान्यता देण्याचा प्रस्ताव दि.१७.०७.२०२५ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर सादर करण्यात आला.
दि.१७.०७.२०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत “श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, अरण ता. माढा जि. सोलापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा” ही नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांमार्फत राबविण्यास मान्यता देवून त्यासाठी रु.१५० कोटी इतक्या रक्कमेच्या विकास आराखड्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सदर मंजूर आराखड्यामध्ये सभा मंडप, भक्त निवास व अन्नछत्र, संतसृष्टी म्युझियम, दर्शन मंडप, स्वच्छतागृह, छत असलेली मार्गिका, देवस्थान प्रशासकीय कार्यालय, बस स्टॉप, मुख्य मंदिर जीर्णोद्धार व सुशोभिकरण, श्री विठ्ठल आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज ब्राँझ पुतळा, स्कायवॉक, पाण्याची टाकी, जुनी विहीर जिर्णोद्धार व सुशोभिकरण, म्युझियम मिडिया रंगकाम व भिंती चित्रे, कमान व वाहनतळ, पालखी तळ सुधारणा, भुमी रचना (हार्डस्केप) व सौंदर्यकरण, पोच मार्ग सुधारणा, पाणी पुरवठा व ड्रेनेज लाइन, जलपुनर्भरण, कचरा संकलन प्रणाली, साइन बोर्ड/दिशा दर्शक कार्यालय, विद्युतीकरण, वातानुकुलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. याबाबतचे उचित शासन निर्णय / आदेश सत्वर निर्गमित करण्यात येत आहे.
सदर विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज तथा जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आराखड्याच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागामार्फत शासन स्तरावर विशेष पाठपुरावा केला आहे.