जयाभाऊ ‘राम – रणजित ‘ वरच एवढा जीव का? ; तुम्ही तर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याने भारतीय जनता पार्टीला तब्बल पाच आमदार दिले परंतु त्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील आमदार जयकुमार गोरे यांना मंत्री करून त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवले.
मागील चार महिन्यात पालकमंत्री गोरे यांचे सोलापूर जिल्हा ऐवजी केवळ माढा लोकसभा मतदारसंघातच सर्वाधिक लक्ष आणि संपर्क राहिल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिला दौरा झाला तो म्हणजे टेंभुर्णी येथील चित्रपट थिएटर उद्घाटनाचा.
त्यानंतर करमाळा, माळशिरस, सांगोला, माढा या तालुक्यावर त्यांचा सर्वाधिक फोकस पाहायला मिळतो. या दौऱ्यांमध्ये माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सर्वाधिक वर्चस्व राहतं. दौऱ्यात या दोन नेत्यांना जया भाऊ झुकतं माप देतात असे चित्र आहे.
सोलापूरचे दौरे कमी होताना पाहायला मिळतात. परंतु प्रत्येक पंधरा दिवसात पालकमंत्री गोरे हे माढा लोकसभा मतदारसंघात दिसून येतात. निश्चितच त्या भागात भाजपची ताकद कमी झाल्याचे पाहायला मिळते. माळशिरस मध्ये तर राम सातपुते हे मोहिते पाटलांच्या विरोधात दंड ठोकून आहेत. त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न गोरे यांचा दिसून येतो.
पण सोलापूर लोकसभा मतदारसंघावर ही त्यांनी लक्ष केंद्रित करावे. या ठिकाणच्या पाण्याच्या समस्या, विकासाचे प्रश्न याकडेही त्यांचे दुर्लक्ष होऊ नये. शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तिकडेही त्यांनी लक्ष द्यावे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत.