“विजयमालक, सचिनदादा, समाधान दादा कुठे आहेत” पालकमंत्र्यांनी जपले राजकीय ऋणानुबंध ; अधिकारी मात्र सव्वा दोन तास ताटकळत
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या पहिल्याच दौऱ्यात आपले राजकीय ऋणानुबंध जपल्याचे पाहायला मिळाले. सोलापुरात अधिकारी मात्र तब्बल सव्वा दोन तास ताटकळत बसले. यादव यात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते यांना आदरयुक्त वागणूक दिली.
जिल्ह्याचे नवे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा पहिलाच सोलापूर दौरा होता त्यामुळे प्रशासनासह राजकीय क्षेत्रात ही उत्सुकता दिसून आली. पालकमंत्री गोरे यांच्या दौऱ्याला माळशिरस तालुक्यातील माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील निवासस्थानी वेळ देऊन सुरुवात झाली.
त्यानंतर पंढरपूर मध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी दुपारचे जेवण घेतले. पुढे मोहोळ मध्ये उमेश पाटील यांच्या सावली बंगल्यावर सदिच्छा भेट दिली. सोलापूर कडे रवाना झाले.
जिल्हा नियोजन कार्यालयात बैठकीची वेळ साडेतीनची होती त्यामुळे सर्व अधिकारी बैठकीला हजर होते पालकमंत्री मात्र पाच वाजून 45 मिनिटांनी नियोजन समितीच्या सभागृहात दाखल झाले. नव्या पालकमंत्र्याच्या स्वागताला जिल्हा प्रशासनाने रेड कार्पेट घातले होते. सुमारे अडीच तास अधिकारी ताटकळत पालकमंत्र्यांची वाट पाहत बसल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी मिटींगला जाताना त्यांनी आवर्जून सोबत ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांना सोबत नेले. यावेळी आमदार समाधान आवताडे याचे नाव घेत बोलावले, सर्वांना शेजारी बसायला खुर्च्या दिल्या. माजी आमदार राजेंद्र राऊत हे नियोजन अधिकारी पवार यांच्या चेंबर मध्ये बसले होते, त्यांनाही त्यांनी बैठकीला बोलवून घेतले.