माजी आमदार रविकांत पाटील अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल
सोलापूर : सोलापूरचे माजी आमदार तथा लिंगायत समाजातील नेते रविकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. रविकांत पाटील हे कर्नाटकातील इंडी या विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा अपक्ष आमदार राहिले आहेत.
रविकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे नेते सुधीर खरटमल यांच्यासह उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली हेाती. त्याचवेळी पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आपण सोलापूरच्या विकास कामांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यावेळी या दोघांनी सांगितले होते.
शनिवारी जुनी मिल कम्पोंडच्या मैदानावर झालेल्या शहराच्या मेळाव्यात त्यांनी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संजयमामा शिंदे, किसन जाधव, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.





















