राम सातपुते यांनी केले सुशीलकुमार शिंदेंना टार्गेट ; शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी
सोलापूर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे 17 वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली. विशेष एनआयए न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे. यानुसार मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
या निकालानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य केले आहे. आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करताना हिंदूंना आतंकवादी म्हणणारे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदूंची जाहीर माफी मागावी या शब्दात तोफ डागली आहे.
जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या (Congress) अधिवेशनात माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ‘हिंदू दहशतवाद’ या विषयावर वादग्रस्त विधान केले होते. काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात शिंदे यांनी भगवा दहशतवाद या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी ‘मला माझ्या पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरुन मी तो शब्द वापरला. मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला, हे मलाही माहीत नाही. असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचा होता. असे सांगितले होते.