एकनाथ शिंदेंसाठी नाही पण तानाजी सावंतांना आरोग्य मंत्री करण्यासाठी सोलापूरचे निलंबित नेते सरसावले !
सोलापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण महाराष्ट्राचे डोके चक्रावून गेले. निवडणुकीच्या एक महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सत्तेवर येईल अशी चर्चा असताना महायुतीने घवघवीत यश मिळवले. निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे हेच समोर आले.
288 पैकी तब्बल 230 हून अधिक जागा महायुतीने जिंकल्या त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे होतील असे जनतेतून व्यक्त होऊ लागले जरी भाजपचे सर्वाधिक आमदार असले तरी शिंदे यांना सुरुवातीचा एक वर्ष मुख्यमंत्रीपद मिळेल असेही बोलले जात होते. त्यासाठी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साकडे घातले. अनेक देवदेवतांना समोर प्रार्थना केली सोलापुरात ही हे पाहायला मिळाले.
या निवडणुकीत सोलापूरचे शहर प्रमुख मनोज शेजवाळ आणि माजी नगरसेवक तथा युवक जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड यांनी बंडखोरी केली. त्यामध्ये शेजवाळ यांनी उघडपणे शहर मध्य मधून आडम मास्तर यांना पाठिंबा दिला तर उमेश गायकवाड हे दक्षिणमधून उमेदवार म्हणून उभे राहिले. पक्षाने याची गंभीर दाखल घेत या दोन्ही नेत्यांना तडकाफडकी निलंबित केले.
राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे परांडा मतदारसंघातून पडता पडता वाचले. काही मोजक्या मताने ते निवडून आले. यंदाच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ संधी मिळते का नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण सावंत यांना पुन्हा राज्याचा आरोग्य मंत्री करावे यासाठी शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले मनोज शेजवाळ आणि उमेश गायकवाड यांनी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. त्यांच्यासोबतच जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुजीत खुर्द, युवा सेना शहर प्रमुख समर्थ मोटे, सागर शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय बंदपट्टे, संजय सरवदे आदी युवा सैनिक, शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यांनी पंढरपुरात जाऊन नामदेव पायरी येथे वारकऱ्यांसमवेत टाळ मृदुंगाच्या तालावर भजन केले. यानंतर श्री विठ्ठलास आणि श्री रुक्मिणीमातेस दुग्धाभिषेक करून, तुळशीहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. तानाजीराव सावंत पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना श्री विठुरायाकडे आणि श्री रुक्मिणीमातेकडे करण्यात आली. याप्रसंगी महिलांनी ‘बा विठ्ठला आमच्या भावास पुन्हा एकदा आरोग्य मंत्री कर’ असे आशयाचे फलक हाती धरले होते.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून यातील काही नेते देव देवतांकडे कुठेही साकडे घालताना दिसले नाहीत मग आता सावंत यांच्यासाठी एवढा पुढाकार का? असा प्रश्न शिवसेनेचेच निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.