जिल्हा प्रशासनाची चॉईस कोण? बापू की दादा !
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या एका कार्यक्रमात आय टी पार्क देण्याची घोषणा केली. ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी या कार्यक्रमात रोजगार निर्मितीची मागणी केली होती, त्या अनुषंगाने फडणवीसांनी ही घोषणा करताना एमआयडीसीला जोडून आय टी पार्क ची जागा बघण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी आय टी पार्क साठी पाठपुरावा केल्याचे पत्र प्रसिद्ध करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावरून भाजपच्याच आमदारांमध्ये श्रेयवाद रंगलाचे दिसून आले. आमदार सुभाष देशमुख यांनी सुद्धा या प्रकरणात कोंडी एमआयडीसी तील जागा सुचवली. पण ती जागा त्या पार्कला पूरक नव्हती.
दोन्ही देशमुख आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आय टी पार्कचा पाठपुरावा केला. या विषयात आपण कमी पडू नये हे सुद्धा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला.
दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यावर जागा शोधण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात अपेक्षित जागा नसल्याने त्यानुसार जिल्हाधिकारी हे जागा पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत होटगी गावाजवळील एक शासनाची जागा पाहिली आहे ती आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघात असून दुसरी जागा त्यांनी पाहिली आहे ती म्हणजे कुंभारी भागात आणि तिसरी जागा बोरामणी परिसरात जो भाग आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघात येतो. तसेच शहर मध्य या मतदारसंघात सुद्धा बऱ्याच मोठ्या मोकळ्या जागा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे प्रयत्नशील आहेत. दरम्यान सप्टेंबर अखेरला आयटी पार्क च्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आता एकीकडे आय टी पार्क वरून पहिलेच भाजप आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला असताना आता जागा कुणाच्या मतदारसंघातून उपलब्ध करून द्यायची याचा साहजिकच दबाव जिल्हा प्रशासनावर असेल यात शंका नाही.