दिलीप माने यांनी कुमठ्यात तर सुरेश हसापुरे यांनी निंबर्गीत केले मतदान ; म्हणाले, मोदींचा प्रभाव फिक्का पडला
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे या गावात मतदानाचा हक्क बजावला तर दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांनी आपले गाव निम्बर्गी येथे मतदान करून नागरिकांना प्रोत्साहित केले.
कुमठे या गावात मतदानानंतर बोलताना माने म्हणाले, माझ्या निवडणुकीनंतर प्रथमच मी इतका प्रतिसाद पाहतो आहे ग्रामस्थ मोठ्या चुरशीने आणि उत्साहात मतदान करत आहेत. यावरून सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा काही उपयोग झाला नाही. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
निम्बर्गी या गावात सुरेश हसापुरे, गंगाधर बिराजदार हे नेते दुपारपर्यंत ठाण मांडून होते. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत सुरेश हसापुरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे सुद्धा दक्षिणच्या दौऱ्यावर पाहायला मिळाले.
दरम्यान मतदानाचा प्रतिसाद पाहून सुरेश हसापुरे म्हणाले, ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे, शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देण्याची निवडणूक आहे, त्यासाठी प्रणिती शिंदे या लढत आहेत आणि एकूणच चित्र पाहता त्या भरघोस मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला.