धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी हजारों समर्थकांची गर्दी ; काडादी यांनाच उमेदवारी द्या ; काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक असणारे सिध्देश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी हजारों समर्थकांनी एकच गर्दी केली आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीतून अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर काडादी समर्थकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.
यामध्ये काँग्रेसचे सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, ऍड मिलींद थोबडे, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे, भीमाशंकर जमादार, राष्ट्रवादी नेते भारत जाधव, गुरुसिध्द म्हेत्रे, स्वाभिमानी नेते शिवानंद पाटील, अशोक निंबर्गी, ऍड संजय गायकवाड, सिद्धाराम चाकोते, भोजराज पवार यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेते, सिध्देश्वर परिवारातील नेते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
अशोक निंबर्गी यांनी प्रास्ताविक केले.
उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविकास आघाडीने उमेदवारी दिलीच पाहिजे अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, हा सामान्यांचा नेता त्यांच्यावर अन्याय आम्ही सहन करणार नाही. काडादी यांची उमेदवारी ही जनतेतून आली, शेतकऱ्यांमधून आलेली आहे, त्यामुळे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे.
शुक्रवारी माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासासमोर त्यांच्याही हजारो समर्थक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता, सोलापुरात सांगली पॅटर्न राबवा अशी मागणी करण्यात आली. दिलीप माने यांनी बंडाचे निशाण फडकावले होते मात्र काही वेळाने ही जागा काँग्रेसला मिळाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
आता काँग्रेस समोर पेच निर्माण होणार असून दक्षिण मधून दिलीप माने की धर्मराज काडादी यांना तिकीट देणार याकडे राजकीय लक्ष लागले आहे.