देवेंद्रभाऊंच्या संवेदनशीलतेमुळे ‘ ठाकरेंचा ‘आजार झाला बरा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. तेवढेच ते त्यांच्या संवेदनशीलपणासाठी ओळखले जातात. नेता असूनही छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला लक्षात ठेवणे आणि त्यांना मदत करणे, हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण.
भाजपा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अडचणीतही अनेकदा त्यांचा थेट सहभाग दिसतो. असाच एक प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी यांनी स्वतःच सांगितला आहे. यात देवेंद्र फडणवीसांमुळे ‘ठाकरें’चा आजार बरा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
रायगड जिल्ह्यातील कर्जतच्या वेदांत ठाकरे हा १३ वर्षीय मुलगा थॅलेसेमिया या गंभीर आजाराने त्रस्त होता. या मुलाच्या पालकांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर, फडणवीसांच्या कार्यालयातून ठाकरे कुटुंबीयांना संपूर्ण मदत करण्यात आली अन् वेदांत ठाकरेवर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत स्वत: फडणवीसांनीच ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
“परिस्थितीवर मात करून, खचून न जाता लढणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे कर्जतचा (रायगड) १३ वर्षाचा वेदांत ठाकरे. काही महिन्यांपूर्वी वेदांतच्या पालकांनी एका भाजप कार्यकर्त्यामार्फत मला संपर्क केला. थॅलेसेमियामुळे वेदांतवर उद्भवलेली गंभीर परिस्थिती त्यांनी मांडली. माझ्या कार्यालयाने प्रयत्न केले. वेदांतवर मुंबईत उपचार करण्यात आले. या आजाराचा उपचार म्हणजे एक कठीण परीक्षाच; पण वेदांत हिमतीने पुढे गेला. थॅलेसेमिया सारख्या गंभीर आजारावर मात केलेल्या वेदांतने कुटुंबासमवेत माझ्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. वेदांत ठाकरेना बरं करण्यात फडणवीसांनी मोलाची भूमिका निभावली.