दक्षिण मध्ये भाजपला टेन्शन दिलीप माने यांचेच ; माने यांचेच नाव आघाडीवर
सोलापूर : सोलापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. सुभाष देशमुख हे या मतदार संघात आपली हॅट्रिक करण्याच्या तयारीत असून भारतीय जनता पार्टीला केवळ माजी आमदार दिलीप माने यांच्याच उमेदवारीचे टेन्शन असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
सिद्धेश्वर परिवाराचे नेते तथा सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे उमेदवार म्हणून इच्छुक झाल्याने दिलीप माने यांची अडचण झाली. मुळात काडादी यांनी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागणी केली आहे. ते तुतारी कडून दक्षिण विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचेही समजते परंतु दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा असल्याने त्या ठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार राहणार आहे. त्यामुळे आता दिलीप माने की काडादी असा पेच पक्षासमोर आहे परंतु पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार दिलीप माने हे पुढे असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या विरोधात दिलीप माने यांची लढत झाली होती तेव्हा एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेस मधील अनेकांनी बंडखोरी केल्याने दिली माने यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभेत मात्र दिलीप माने हे महायुतीत होते तेव्हा मात्र दिलीप माने यांचा देशमुख यांना मोठा फायदा झाला. देशमुख हे शहरी आणि उत्तर तालुक्यातील गावांवर मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यामध्ये माने यांचे मोठे श्रेय असल्याचे माने यांचे कार्यकर्ते सांगतात.
दक्षिण मध्ये दिलीप माने हेच सरस ठरतात. त्याला कारणेही तशीच आहेत. दक्षिण मधील सर्वच गावांमध्ये दिलीप माने यांचा स्वतंत्र गट आणि समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत तसेच दक्षिण मधील शहरी भागात दिलीप माने यांची बांधणी जोरात आहे. उत्तर तालुक्यातील तर सर्वच गावांमध्ये माने यांचेच वर्चस्व पाहायला मिळते. त्यामुळेच दक्षिण मध्ये भाजपला माने यांचेच टेन्शन असल्याचे ऐकण्यास मिळते आता काँग्रेस पक्ष नक्की कुणाला उमेदवारी देणार याकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सुभाष देशमुख दिलीप माने यांच्यात लढत झाली तर अतिशय तगडी फाईट या मतदारसंघात पाहायला मिळेल यात शंका नाही.