दक्षिणमध्ये ‘मामा’ देणार ‘बापूं’ना टेन्शन ; सुभाष देशमुखांकडे पण आहे हा हुकमी एक्का !
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. शहर मध्य या मतदारसंघानंतर आता सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे खासदार प्रणिती शिंदे यांना दक्षिण विधानसभा मतदारसंघातून नऊ हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे काँग्रेसमध्येही इच्छुक वाढले आहेत.
एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टी करूनही आता उमेदवारीची मागणी केली जात आहे. राज्याचे माजी सरकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे मागील दोन टर्म दक्षिण तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. विरोधामध्ये जितके उमेदवार तितका सुभाष बापूंना फायदा निवडणुकांमध्ये होतो हे मागील दोन निवडणुकांमध्ये दिसून आले आहे.
यावेळी काँग्रेसला वातावरण काहीसे चांगले असल्याने सुभाष देशमुख यांना उमेदवारी मिळणार की नाही असे तर्क वितर्क राजकीय वर्तुळात काढले जात असल्याने आता भाजपमध्ये इच्छुक वाढले असल्याचे पाहायला मिळते. या इच्छुकांमध्ये लिंगायत समाजातील नेते श्रीशैल मामा हत्तुरे यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधण्याची तयारी केली आहे.
श्रीशैल हत्तुरे हे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी सुद्धा त्यांनी निवडणूक लढवण्याची भाषा केली होती काही करून आपण बंडखोरी करणार अशा भूमिकेत ते दिसून आले परंतु त्यावेळची परिस्थिती पाहता स्वतः विजय मालकांनी हत्तूरे यांना माघार घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे मामा गप्प राहिले. यंदा मात्र काहीही करून आपण भाजपकडून उमेदवारी मागणार जर नाही दिली तर अपक्ष मैदानात उभारण्याची भाषा त्यांनी नुकतीच प्रसार माध्यमांशी बोलून दाखवली आहे.
सुभाष देशमुख ही कच्चे खिलाडी नाहीत, त्यांच्याकडेही एक हुकमाचा एक्का आहे, तो म्हणजे बाजार समितीचे संचालक, होटगीचे सावकार रामप्पा चिवडशेट्टी. चिवडशेट्टी हे बापूंचे कट्टर समर्थक मानले जातात. आणि चिवडशेट्टी हे श्रीशैल मामा हत्तूरे यांचे मेव्हणे आहेत. हा हुकुमचा एक्का असल्याने बापू आपली चाल कधीही चालू शकतात मात्र मामांनी विसरू नये.