दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’
सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अब की बार 75 पार असा जोरदार नारा देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूर मध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलेच हिनवले होते.
अजित पवारांनी सोलापूरची जबाबदारी माजी पालकमंत्री, राज्याचे कृषिमंत्री भरणे मामा तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर दिली. त्यामुळे सोलापूरच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.
मामा सह अण्णांनी दोन वेळा सोलापूरचा दौरा केला. अण्णा बनसोडे यांनी तर तीन दिवस सोलापुरात तळ ठोकून फिल्डिंग लावली होती, त्यामुळे वातावरण चांगले तयार झाले. महापालिकेचा अभ्यास असल्याने अण्णा बनसोडे यांनी अनेक प्रश्नांमध्ये हात घातला होता. विशेष करून पाणीपुरवठ्यात लक्ष घातल्याने भाजपला त्रास झाल्याचे दिसून आले.
सोलापुरात मुस्लिम समाजाला राष्ट्रवादीने सर्वाधिक उमेदवारी दिल्याने हा समाज राष्ट्रवादीकडे आकर्षिला गेला परंतु एमआयएम या पक्षाने दोन मोठ्या सभा घेऊन मुस्लिम समाजात जमातचा प्रश्न समोर आणून अजित पवारांवर टिकेची झोड उठवली.
अण्णांच्या भरोशावर शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे हे नेते मोठ्या दिमाखात निवडणुकीला सामोरे गेले. अनेकांना अपेक्षा होती अजित पवारांची सभा होईल, अजित पवार येऊन जातील परंतु तसे झाले नाही.
अण्णा बनसोडे यांनी तर कार्यकर्त्यांचे साधे फोनही उचलले नसल्याचे सांगण्यात येत आहे. एका तर कार्यकर्त्यांनी तब्बल दोनशे वेळा अण्णांना फोन लावला परंतु नो रिप्लाय.
दादा आणि अण्णांच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे. सोलापुरात राष्ट्रवादीचे अक्षरशः पानिपत झाले. एकूणच आता पक्षाला उभारी देण्याची गरज असून पक्ष वाढीसाठी नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे लक्ष असून दादा आणि अण्णांनी सोलापूरच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चुना लावल्याचे मजेशीररित्या आता बोलले जात आहे.



















