काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे जंगी स्वागत ; 29 ऑक्टोबर पर्यंत थांबा, गडबड करू नका
सोलापूर : सहा महिन्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे गुरुवारी हाती घेतली. जेव्हा धवलसिंह मोहिते पाटील यांचे काँग्रेस भवन मध्ये आगमन झाले तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर काँग्रेस भवन मधील सभागृहात विधानसभा निहाय मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला सर्व वरिष्ठ उपाध्यक्षांसह तालुकाध्यक्ष व इतर जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने धवलसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत बोलताना प्रत्येक तालुका अध्यक्षांनी काँग्रेस पक्षाला या विधानसभा निवडणुकीत विश्वासात घेतले नसल्याच्या तक्रारी मांडल्या. विशेष करून दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना त्या ठिकाणी शिवसेनेला उमेदवारी दिली गेली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे? बार्शी मध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले नाही असाही आरोप करण्यात आला. त्यामुळे दादा या विधानसभा निवडणुकीत आम्ही काय भूमिका घ्यायची असा सूर पदाधिकाऱ्यांमधून पुढे आला.
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना मोहिते पाटील यांनी अजून काँग्रेस पक्ष तसेच शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची यादी समोर आलेली नाही. यामुळे अद्याप चित्र अस्पष्ट आहे. 29 ऑक्टोबर रोजी चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांत राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी केले.