सोलापुरात काँग्रेसची मशाल रॅली ; ‘मतदान चोर, खुर्ची सोड’ घोषणांनी सोलापूर दणाणले !
सोलापूर : काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला देश पातळीवर चांगलेच कात्रीत पकडले असून मतदान चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे याच पार्श्वभूमीवर सोलापुरात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्यदिनी सायंकाळी जोरदार मशाल रॅली काढून लक्ष वेधले.
‘मतदान चोर, खुर्ची सोड’ घोषणांनी सारा परिसर दणाणहून गेला होता. सोलापूर शहरातील बलिदान चौकातून निघालेली ही रॅली सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ, मेकॅनिकी चौक, प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी विसर्जित झाली.
जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, रियाज हुंडेकरी, श्रीशैल रणधीरे, सुशील बंदपट्टे, प्रमिला तूपलवंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी ऐंशी वर्षांपूर्वी आपण स्वातंत्र्यासाठी लढलो. आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईसाठी तयार राहण्याची वेळ आली आहे. देशाला आपल्या मुठीत ठेवणाऱ्या हुकूमशहाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे लागेल. या लढाईची सुरुवात राहुल गांधींनी केली आहे. देशातील गरीब असो, श्रीमंत असो, मागास असो, लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाकडे एकच प्रभावी शस्त्र आहे, ते म्हणजे मतदान. पण हेच मतदान चोरले जात आहे, आणि यापेक्षा लोकशाहीला मोठा धोका दुसरा कोणताच नाही. आणि हीच ती वेळ, हीच आपली परीक्षा आहे. चला, आपण सर्वजण दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढायला सज्ज आणि तयार व्हा असे आवाहन केले.