सोलापुरात काँग्रेस पदाधिकारी भेटले जिल्हाधिकाऱ्यांना ; मतदान केंद्राच्या परिसरात……
सोलापूर : काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी सभागृह नेते बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, मीडिया सेलचे तिरुपती परकीपंडला, नासीर बंगाली, सुभाष वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस, महाविकास विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आ. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढविली होती. ०७ मे २०२४ रोजी मतदान झाले असून ०४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर, किंवा वायफाय ईत्यादीच्या माध्यमातून छेडछाड ( हँकिंग ) करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकांच्या मनात असून निवडणूक प्रक्रीयेत निष्पक्षता रहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून रामवाडी गोडावून सोलापूर येथील निवडणूकीत वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवर ही बंद ठेवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.