नई जिंदगी भागात काँग्रेसने दिला नवा चेहरा ; सोनवणेना थेट सरचिटणीस पदावर संधी
सोलापूर : नगर विकास फाउंडेशनचे अध्यक्ष, काँग्रेस कार्यकर्ते संतोष सोनवणे यांची काँग्रेस पक्षाने शहर सरचिटणीस पदावर निवड केली आहे. एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्ह्याचे अध्यक्ष सातलिंग षटगार यांच्या उपस्थितीत सोनवणे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

नई जिंदगी परिसरात काँग्रेसचा चेहरा मानले जाणारे माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन काँग्रेसचा हात सोडून प्रहार ची बॅट हातात घेतली होती. काँग्रेस मधून बाबा गेल्याने आता नई जिंदगी मध्ये काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा आहे. माजी नगरसेविका परवीन इनामदार आणि माजी नगरसेविका अनुराधा काटकर हे जरी काँग्रेसमध्ये असले तरी काँग्रेस या भागात युवा चेहरा देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होते.
आपल्या सामाजिक कार्यातून कायमच चर्चेत राहणारे जुने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व कधीच न सोडणारे, कट्टर समर्थक, जाई जुई विचार मंचचे जुने सहकारी संतोष सोनवणे यांना काँग्रेस पक्षाने थेट सोलापूर शहर सरचिटणीस पदी निवड केली आहे. या भागात आता खासदार प्रणिती शिंदे या युवा चेहऱ्याकडे नेतृत्व देण्याच्या तयारीत असल्याचे माहिती आहे.
या निवडी प्रित्यर्थ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नुकताच माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रदेश सरचिटणीस श्रीशैल रणधिरे यांच्या उपस्थितीत सोनवणे यांचा सत्कार घडवून आणला. शिंदे यांनी सोनवणे यांना शुभेच्छा देताना काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन केले.