काँग्रेसचा माजी नगरसेवक ही काकांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत ; या प्रभागातून मागितली उमेदवारी
सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोलापुरात सत्ताधारी महायुती एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे दिसत असून दुसरीकडे महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे.
सध्या भाजप नंतर सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती दिली जात असल्याचे पाहायला मिळते. भाजपकडे 800 अर्ज आले असले तरी राष्ट्रवादीकडे ही चारशे हून अधिक अर्ज आले आहेत.
दोन वर्षापूर्वी काँग्रेस मधून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले सुधीर खरटमल यांनी पक्षातील वातावरण पाहता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचे पुतणे काँग्रेसचे माजी नगरसेवक विवेक खरटमल यांनी प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवारीची मागणी केली आहे.
मौलाली चौक, आंबेडकर नगर, शानदार चौक या परिसरात विवेक खरटमल यांनी यापूर्वी काम केले असून त्यांची ओळख आहे. त्या भागाचे ते नगरसेवक होते. सध्याच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आंबेडकरी समाज, मुस्लिम समाज मोची समाज यांची सर्वाधिक मते आहेत. खरटमल यांनी अनुसूचित जाती सर्वसाधारण मधून उमेदवारी मागितली असून आता त्यांच्या सोबतीला मुस्लिम समाजातील दोन आणि एक मोची समाजातील उमेदवार पक्षाने द्यावेत अशी मागणी होत आहे.
या प्रभागात एमआयएम, भाजप, काँग्रेस यांना राष्ट्रवादीला टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे सामाजिक समतोल राखून उमेदवारी दिल्यास निश्चितच पक्षाला मदत होईल यात शंका नाही.




















