दिलीप माने यांची किती मदत झाली? सुभाष देशमुखांना प्रश्न ; देव आणि देवाभाऊंनाच माहीत असे का म्हणाले बापू…
सोलापूर : दक्षिण सोलापूरचे तिसऱ्यांदा आमदार झालेल्या सुभाष देशमुख यांनी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भरपूर राजकीय गप्पा मारल्या. या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी निंदा केली त्यांचे आपल्या स्वभावी भाषेत आभार मानले.
मला या मतदारसंघातून अनेकांनी विरोध केला. त्यामुळे मी नाराज झालो होतो, ती नाराजी आणि उमेदवारी नको म्हणून मी वरिष्ठांसमोर बोलून दाखवली पण नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा उमेदवारी दिली त्यानंतर मी जोमाने कामाला लागलो, मनीष देशमुख यांनीही सर्वांशी जुळवून घेत निवडणुकीचे योग्य नियोजन केले आणि त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला या विजयातून त्यांनी उत्तर दिले.
दरम्यान दिलीप माने यांची कितपत मदत झाली असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मला या निवडणुकीत दृश्य अदृश्य जितक्या शक्तींनी मदत केली मी त्यांचे आभार मानतो.
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होत आहे सोलापूर जिल्ह्यातून ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे दरम्यान सुभाष देशमुख यांना उद्याचे काय असे विचारले असता देव आणि देवा भाऊंनाच माहीत, मी उद्या माझ्या घरचा कार्यक्रम विवाह सोहळा असल्याने सोलापुरातच राहणार आहे असे उत्तर दिले. यावेळी त्यांचा चेहराच सर्व काही सांगून गेला.