भाजपच्या नेतृत्वात दम नाही ; विसरू नका सोलापूरची खासदार काँग्रेसची आहे ; प्रणिती शिंदेंनी या विषयावर बोलण्यास दिला नकार
सोलापूर : संसदेमध्ये देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. शहा यांनी माफी मागावी आणि त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी काँग्रेसची मागणी आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे असतानाही मंत्रीपद मिळाले नाही यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूरचे दुर्दैव म्हणावं लागेल. भाजपच्या नेतृत्व सक्षम नसल्याचे यावरून सिद्ध होते असे सांगताना सोलापूरच्या भाजप नेत्यांमध्ये ‘मी भारी का तू भारी’ यामध्येच भांडणे असतात हे नेतृत्व जाणून आहे म्हणूनच सोलापूर मंत्री पदापासून दूर असल्याची टीका करताना विसरू नका सोलापूरची खासदार मी आहे असे ठणकावून सांगितले.
सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदा बाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ही पत्रकार परिषद फक्त अमित शहा यांचा वक्तव्याच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी पत्रकार परिषद संपवली.