जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा उत्कृष्ट नियोजनाबद्दल सत्कार ; अजित दादा असं काय बोलले उपस्थित सर्वांमध्ये हशा पिकला
सोलापूर : महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापुरात मुख्यमंत्री माझी लाडके बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सोलापुरात येणार होते. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाला. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शान वाढवली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारसाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी सोलापुरात पाच ते सहा वेळा या कार्यक्रमाची तारीख रद्द झाली. शेवटी हा कार्यक्रम 8 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते. मागील चार दिवसांपासून त्यांनी होम मैदान येथे स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक नियोजनाची पाहणी केल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमात कोणतीही कमतरता असू नये याकडे त्यांची बारीक नजर होती.
शेवटी हा कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा सत्कार केला.
जेव्हा सत्कार घ्यायला आशीर्वाद या दोन नेत्यांच्या मध्ये गेले तेव्हा या दोघांपेक्षा आशीर्वाद हे उंच होते. त्यावेळी अजित पवार यांनी जिल्हाधिकारी साहेब नेमकी उंची किती? सहा फूट की सात फूट असे विचारताच उपस्थित सर्वच नेत्यांमध्ये हशा पिकला. स्वतः जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनाही अजितदादांचे ते शब्द ऐकून हसू आले.