लोकसभा, दुष्काळ व आषाढी वारीचे उत्कृष्ट नियोजन ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यशस्वी वर्षपूर्ती, सीईओ मनीषा आव्हाळे यांनी झेडपीला दिले ‘घरपण’
सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या सोलापुरातील प्रशासकीय कारकीर्दीला आज 22 जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन 21 जुलै 2024 रोजी तीन वर्ष पूर्ण झाले आहे.
या दोन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कामकाजांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांचे प्रमोशन होऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी पदी नियुक्त झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते त्यांनी पदभार घेतला. सोलापूर जिल्ह्यात पडलेला दुष्काळ या दुष्काळाच्या दरम्यानच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये आपल्या प्रशासनाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभा निवडणूक आणि दुष्काळामध्ये चांगले काम केले. सोलापूरचे वरदायीनी म्हणून समजल्या जाणाऱ्या उजनी धरणात वजा 50 टक्के पेक्षा अधिक पाणी असताना सुद्धा पाण्याचे योग्य त्यांनी नियोजन केले. कुठेही दुष्काळाची ओरड जाणू दिली नाही. ज्या गावात तातडीने गरज आहे तिथे टँकर सुरू केले चाऱ्याचा प्रश्न जास्त उद्भवू दिला नाही.
यंदाची लोकसभा निवडणूक ही जाती धर्मावर गाजली. देशात वातावरण ही तसेच तयार झाले होते परंतु सोलापूरमध्ये सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय शांततेत निवडणुका पार पडल्या. कोणताही गोंधळ पाहायला मिळाला नाही योग्य पद्धतीने त्यांनी ही लोकसभा निवडणूक हाताळली.
त्यानंतरच्या आषाढी वारीमध्येही त्यांनी स्वच्छता आणि वारकऱ्यांच्या आरोग्यावर भर दिला. यावेळी त्यांनी आषाढी वारीमध्ये अनेक बदल केलेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कामकाजावर समाधानी पाहायला मिळाले. एकाच वर्षात लोकसभा निवडणूक, दुष्काळ परिस्थिती आणि आषाढी वारीचे नियोजन यामध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यशस्वी ठरले आहेत त्यांनी केलेल्या कामाची पावती एक वर्षपूर्ती निमित्त त्यांना द्यावी लागेल.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेतील शिस्तीला प्राधान्य दिले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयाची स्वच्छता, मुख्यालय डागडूजीकरण यावर भर देताना जिल्हा परिषदेला घरपण देण्याचा प्रयत्न केला आहे. आज जर मुख्यालयामध्ये गेले तर चित्र वेगळं पाहायला मिळतं. सर्वत्र मुख्यालयाचे कामकाज आणि नूतनीकरण दिसून येईल. येणाऱ्या काही महिन्यात जिल्हा परिषदेचे रुपडे बदललेले दिसून येईल. जिल्हा परिषदेच्या शाळा, शैक्षणिक गुणवत्ता, अंगणवाडी शिक्षणावर त्यांनी भर दिल्याचे पाहायला मिळते.