ब्रेकींग : जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा निकाल ; वांगी गावच्या सिता खडाखडे यांचे सरपंच पद रद्द
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावच्या सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचे सरपंच पद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रद्द केले आहे. खडाखडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिला आहे.
धरेप्पा रामा खडाखडे यांनी सरपंच सीता खडाखडे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. वांगीचे सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यामुळे अपात्र करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 30 -1 अ अन्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही कारवाई केली.
नोव्हेंबर २०२२ मध्ये सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत अनुसूचीत जमाती प्रवर्गातून सीता खडाखडे या सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. वांगी येथील रहिवासी धरेप्पा खडाखडे यांनी वांगी सरपंच पदाची मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याची तक्रार एडवोकेट शरद पाटील यांच्यामार्फत दाखल केली होती.
या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या समोर सुनावणी आली. त्यावेळी शरद पाटील यांनी असा युक्तिवाद केला की, वांगीच्या सरपंच सिता खडाखडे यांचा जातीचा दाखला अनुसुचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे विभाग, पुणे यानी अवैध घोषित केला आहे. तसेच अनुसूचीत जमातीचे असल्याबाबतचे जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांची निवड भुतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे जाहीर करुन वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित करण्यात यावे असा युक्तिवाद केला.
सदर युक्तिवाद ग्राह्य धरुन जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सिता खडाखडे यांची थेट सरपंच म्हणून आलेली निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाले असल्याचे घोषित केले व खडाखडे यांना वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सदस्य म्हणून चालू राहण्यास अपात्र घोषित केले.