प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या आरोग्य विभागाला सक्त सूचना ; थेट धाडी टाका
सोलापूर, दिनांक 5(जिमाका)– गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (PCPNDT) अंतर्गत लिंग निवडीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील गुन्हे दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. गुप्त पद्धतीने गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रांवर धाडी टाकण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देऊन सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देशही प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले.
जिल्ह्यातील एडस् प्रतिबंध, लिंग निवड प्रतिबंध आणि तंबाखू नियंत्रणासाठी जिल्हा दक्षता समिती व जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अभय शिंदे तसेच स्त्रीभ्रूण हत्येविरोधात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. जंगम यांनी एडस् बाधित रुग्णांना वेळेवर औषधे मिळत आहेत का याचा आढावा घेतला. औषधांच्या तुटवड्याबाबत माहिती घेतली आणि जनजागृतीसाठी जिल्ह्यात शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या सुविधा कमीत कमी कागदपत्रांवर उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गॅरेज आदी ठिकाणी फलकाद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश श्री जंगम यांनी देऊन तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबतही त्यांनी आदेशित केले.
प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत दिली.