जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्न आता राज्यभरात लागू होणार
छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या प्रशासकीय नवकल्पनांना आता राज्य शासनाने राज्यस्तरावर स्वीकार केला आहे. महसूल विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता, समन्वय आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी स्वामी यांचे १५ मे २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशाचे शासन निर्णयात रूपांतर केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पॅटर्न वर आधारित महसूल विभागाची नवी कार्यपद्धती राज्यात लागू करणेत आली आहे.
महसूल प्रशासनातील नवे पर्व
………………….
१५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन करण्यासाठी आणि कामकाज अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी एक सुसंगत कार्यप्रणाली तयार केली होती.
या निर्णयामुळे तालुका व मंडळ स्तरावरील फाइल व्यवहार, नोंदणी, नागरिक सेवा आणि शासकीय योजना यामध्ये कार्यक्षमता व पारदर्शकता वाढली.
या उपक्रमामुळे महसूल विभागातील कामकाजाचा वेग वाढला, फाइल अडकण्याचे प्रमाण कमी झाले आणि नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद मिळू लागला. जिल्ह्यातील प्रशासन अधिक नागरिकाभिमुख बनविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे राज्यभर कौतुक झाले.
राज्य शासनाचा गौरवपूर्ण निर्णय
महसूल व वन विभागाने १० ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य शासनाचा आदेश प्रसिद्ध करून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तयार केलेली ही यंत्रणा आदर्श मानून संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल प्रशासनात लागू करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव
राज्य शासनाच्या या निर्णयानंतर विविध जिल्ह्यांतील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय तज्ञांनी दिलीप स्वामी यांच्या कार्यशैलीचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा प्रशासनाने अनेक नवकल्पना आणि जनतेशी थेट संवाद साधणारे उपक्रम राबवले. कार्यालयीन कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, तसेच नागरिकांसाठी उपलब्धता वाढविणे — या सर्व बाबींमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देत, त्यांनी प्रशासनातील “प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता” या दोन मूलभूत मूल्यांवर भर दिला.
त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने केवळ कामकाजात सुधारणा केली नाही तर राज्यस्तरीय मानदंड निर्माण केला.
महसूल प्रशासनात नवा आदर्श
राज्य शासनाने दिलीप स्वामी यांच्या आदेशाचा स्वीकार करून त्याचे राज्यभर विस्तार केले, ही बाब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या प्रशासनासाठी अभिमानाची आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महसूल विभागात एक नवीन अनुशासन, उत्तरदायित्व आणि जनतेप्रती संवेदनशीलता निर्माण होणार आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि निष्ठावान कार्यामुळे महसूल विभागातील कामकाजाचे नवे पर्व सुरू झाले आहे.त्यांचे हे प्रयत्न आज राज्यभरातील अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.