मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पांचे दर्शन घेत ‘शहर मध्य’वर चर्चा ; जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची फिल्डींग
सोलापूर : गणेशोत्सव निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या बाप्पांचे दर्शन सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी घेतले. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनीष काळजे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्य या मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, एम आय एम, एकनाथ शिंदे गट शिवसेना या पक्षाच्या उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघातील हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता आणि इच्छुकांना हा मतदारसंघ सेफ झाल्याचे दिसत आहे. सोलापूरच्या शिंदे घराण्याचा इतिहास पाहिला तर सुशीलकुमार शिंदे यांनी जो विधानसभा मतदारसंघ सोडला त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार निवडून आला. त्यामुळे मध्य मधून शिवसेनेला चांगली संधी आहे.
जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी या मतदारसंघातून जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून या मतदारसंघात सर्व समाजाच्या वस्त्यांमध्ये विकास कामे केली आहेत. या भागातील मुस्लिम समाज, मोची समाज, आंबेडकरी समाज, लोधी समाज, पद्मशाली समाज या ठिकाणी त्यांनी विकास निधी देऊन आपले लक्ष वेधले आहे. शहरातील इतर पदाधिकाऱ्यांचे पाठबळ ही काळजे यांना मिळताना दिसत असून शहर मध्य ची उमेदवारी मिळाल्यास निश्चितच या ठिकाणी शिवसेनेचा आमदार म्हणून काळजे हे विधानसभेत जातील अशी चर्चा शिवसैनिकांमधून आहे.