सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2022 साली पंढरपूर मध्ये आषाढी वारी निमित्त पहिली महापूजा केली. नवीन मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे यांचा पंढरपुरात उत्साह दिसून आला. तत्कालीन राज्य सरकारने सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबविला. सोलापूर जिल्ह्याने या उपक्रमात सहभाग नोंदवत अनेक तहसिल, सर्कल आणि तलाठी कार्यालय सुंदर आणि गतिमान केली. त्याची दखल राज्याला घ्यावी लागली होती.
हा उपक्रम उत्कृष्ठरित्या राबविणाऱ्या तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांना आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी उपक्रमाचे कौतुक करीत जिल्ह्यातील आणखी कार्यालय सुंदर व गतिमान करण्यासाठी 5 कोटींच्या निधीची घोषणा केली होती. आता वर्ष झाले पण मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे कोणताही निधी जिल्हा प्रशासनाला अद्यापही मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा हवेतच विरली का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



















