‘शहर मध्य’ वर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची दावेदारी ; मनोज यलगुलवार गप्प का?
सोलापूर : काँग्रेसच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शहर मध्य या मतदारसंघात आता इतर कार्यकर्त्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. मध्य मध्ये मुस्लिम समाज, मोची समाजाने आपली दावेदारी सांगितली आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते आणि शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनीही उमेदवारी मागणी केल्याने या मतदारसंघात चुरस वाढली आहे.
हे सर्व होत असताना, अनेक कार्यकर्ते आमदारकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले असताना यलगुलवार हे गप्प का? असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. या मतदारसंघाचा प्रचंड अभ्यास असलेले मनोज यलगुलवार यांच्याकडून उमेदवारी मागणीची हालचाल का दिसत नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी या मतदारसंघात दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट जाहीर झाले असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या सांगण्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर यांच्यासाठी ते बाजूला झाले. 2009 ला प्रणिती शिंदे यांच्यासाठी सुद्धा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनीच घेतली. सलग तीन निवडणुका त्यांनी प्रणिती शिंदे यांचे प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
त्यांचे चिरंजीव मनोज यलगुलवार हे नगरसेवक होते, युवक काँग्रेसचे तीन वर्ष अध्यक्ष राहिले आहेत, लोकसभा अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम केले आहे, शहर कार्याध्यक्ष म्हणून हे काम पाहत आहेत, प्रणिती शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघाच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग पाहायला मिळाला.
यलगुलवार पिता पुत्रांना शहर मध्य या मतदारसंघाच्या प्रश्नाची जाण आहे, कायम पक्षाशी एकनिष्ठ राहिले, शिंदे कुटुंबाशी सुद्धा एकनिष्ठ आहेत, दुसऱ्या सारखे पक्ष सोडला नाही, बंडखोरी केली नाही. पद्मशाली, मोची, मुस्लिम, बेडर, मागासवर्गीय, लोधी समाजात त्यांचे काम आहे. असे असताना मनोज यलगुलवार इच्छुक म्हणून पुढे का येत नाही असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे.