शहर मध्य कुणाला? काँग्रेसचा ठराव होताच दुसऱ्याच दिवशी आडम मास्तर ‘ जनवात्सल्य’ वर ; सुशीलकुमारांची घेतली भेट
सोलापूर दि.१०:- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीत सोडून निवडून आणले. वास्तविक पाहता त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडून प्रकाश यलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने तडफेने मांडणारा आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होती. याकरिता त्यांना २००४ साली आघाडीत जागा सोडण्यात आली. यावेळी शहरमध्य विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे खासदार म्हणून संसदेत गेलेले आहेत. तेंव्हा शहरमध्य विधानसभा मतदार संघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व २००४ सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.
बुधवार दि. १० जुलै २०२४ रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवास्थानी सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदार संघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली.
यावेळी या शिष्टमंडळात कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कुर्मय्या म्हेत्रे, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. अब्राहम कुमार, कॉ. म.हनिफ सातखेड, कॉ. शंकर म्हेत्रे, अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी, मोहन कोक्कुल, अरुण सामल, शामसुंदर आडम, आदींची उपस्थिती होती.