अजितदादांची मनधरणी करण्यात चंदनशिवे अपयशी ; अजित पवार गटबाजीला वैतागले ! काय घडले दिलीप माने यांच्या फार्म हाऊस वर
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल एक तास विनवणी केल्यानंतरही माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या निवासस्थानाकडे गेले नाहीत. पक्षांतर्गत चाललेल्या गटबाजीचा मोठा फटका चंदनशिवे यांना बसल्याचे पाहायला मिळाले.
माजी आमदार दिलीप माने यांच्या तिरे गावातील फार्म हाऊसवर हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हुरडा पार्टीला अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संजय मामा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होती.
अजित पवारांच्या शनिवारच्या शासकीय दौऱ्यामध्ये सायंकाळी साडेआठ वाजता माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मिलिंद नगर येथील निवासस्थानी भेट असा प्रोग्राम घेण्यात आला होता. परंतु अजित पवार त्या भेटीला गेलेच नाहीत जेव्हा ते माने यांच्या फार्म हाऊसवर आले. तेव्हा शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष बागवान, प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांना विनवणी केली. तेव्हा अजित पवार यांनी तुमच्या गटबाजीला मी आज वैतागलो असे दीपक साळुंखे आणि उमेश पाटील यांच्याकडे बघून म्हणाले. तेव्हा साळुंखे पाटील यांनी “दादा मी कुठे काय केले, मी त्यांना कधी नाही म्हणालो, असे म्हणून गप्प बसले.
“मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, घरी जाऊन प्रवेश देऊ का? त्यांना दुपारच्या मेळाव्यामध्ये येता येत नव्हते का? एका माजी आमदाराने आपल्या स्टेजवर येऊन प्रवेश घेतला असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना झापले. त्यानंतर मागोमाग आनंद चंदनशिवे तिथे आले त्यांनी दादांना बराच वेळ विनंती केली,
दिलीप माने यांनीही चांगला माणूस आहे, त्यांच्या घरी भेट द्या अशी विनंती पवारांना केली, प्रवीण डोंगरे यांनीही दादांना चंदनशिवे यांच्या बाबत कानात सांगत आपण जावे अशी विनंती केली. नंतर जेवणासाठी सर्व आत गेले अर्धा तास शहराचे नेते बाहेर थांबून होते, शेवटी अजित दादांच्या गाडीत चंदनशिवे, संतोष पवार, उमेश पाटील हे बसून निघाले. सर्वांना वाटले दादा आता चंदनशिवे यांच्या निवासस्थानी जातील परंतु वाटेतच या नेत्यांना त्यांनी उतरल्याचे समजले आणि ते थेट बारामतीला निघून गेले.
या अजित पवारांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या शहर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये असलेली गटबाजी उघड झाली मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराचे अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा एक गट तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आमदार यशवंत माने गटनेते किसन जाधव यांचा दुसरा गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. किसन जाधव आणि दीपक साळुंखे यांच्या जाहिरातींमध्ये कुठेही उमेश पाटील यांचा फोटो नव्हता, किसन जाधव यांच्या कार्यक्रमाला संतोष पवार, जुबेर बागवान उपस्थित नव्हते. काही नेते जाणीवपूर्वक उमेश पाटील यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
शहराच्या कार्यक्रमाला किसन जाधव दादांसोबत उपस्थित राहिले. अजित पवार यांनी शहर मेळाव्यामध्ये या गटबाजी वरून उपस्थित नेत्यांना चांगलेच सुनावले. समन्वयाने काम करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, पक्ष मोठा करायचा आहे, सर्वांना घेऊन पक्ष वाढवा. अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. याच गटबाजीचा मोठा फटका आनंद चंदनशिवे यांना बसल्याचे बोलले जात आहे. चंदनशिवे यांनी आपल्या भागामध्ये अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती दहा जेसीबी मधून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जाणार होता त्रेनने भला मोठा हार अजित पवार यांना ते घालणार होते परंतु त्यांच्या आशेवर पाणी फिरले.