ब्रेकिंग : उत्तर सोलापूरच्या तहसीलदार उज्वला सोरटे यांची केवळ 26 दिवसात बदली
सोलापूर : उत्तर सोलापूरच्या तहसीलदार उज्वला सोरटे यांची केवळ 26 दिवसात पुन्हा बदली करण्यात आली आहे. राज्याच्या महसूल विभागाने बुधवारी पाच तहसीलदारांच्या बदलीचे आदेश काढले त्यामध्ये उत्तरच्या तहसीलदार उज्वला सोरटे यांचे नाव असून त्यांना पुणे नागरी समूह तहसीलदार पदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर मात्र अद्याप कोणाची नेमणूक झालेली नाही.
उज्वला सोरटे यांची 16 फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती.
तहसीलदार सैफन नदाफ यांच्या बदलीनंतर उत्तर सोलापूरचे तहसीलदार पद रिक्त होते त्यामुळे त्यांच्या जागेवर कोण येणार? अशी चर्चा होती उत्तर सोलापूरचा तहसीलदार म्हणजे संपूर्ण सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुका या भागाचे कामकाज पहावे लागते. त्यामुळे या पदाला सोलापूर शहरात अतिशय महत्त्व आहे.
यापूर्वी सोरटे या मुख्यालयात तहसीलदार सर्वसाधारण पदावर होत्या. त्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंद्रूप या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण केले त्या अप्पर तहसीलदार पदी प्रथमच उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली. त्या ठिकाणी काही राजकीय नेत्यांसोबत त्यांचा चांगलाच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान त्यांची बदली सातारा या ठिकाणी झाली नंतर त्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार पदी त्यांची नियुक्ती झाली, मात्र काही अशा घडामोडी घडल्या की त्यांच्या जागेवर किरण जमदाडे यांची तहसीलदार पदी नियुक्ती झाली होती.