ब्रेकिंग : सोलापुरात पुढील दोन दिवस रेड अलर्ट ; मुसळधार पावसाचा अंदाज
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.
मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा तसेच धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. मागील १५ दिवसांच्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोलापूरमधील सीना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापुरात अल्पविरामानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत असून, पुराच्या पाण्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे. वाडकबाळ पुलावरील पाणी अद्याप ओसरलेले नसल्याने सोलापूर–विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंदच आहे. या ठिकाणी महामार्ग तळ्यासारखा दिसत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, त्यामुळे सीना नदीला पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. माढा, करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जनावरे आणि घरगुती साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही प्रशासनाकडून दिले जाणार आहेत.
.