सोलापूर : आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर विजेते शिक्षक रणजित डीसले यांच्या अडचणीत वाढ झाली होती, त्यांची परदेशवारी जिल्हा परिषदेने नाकारली अशा बातम्या मागील दोन दिवस समोर आल्या.शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सर्व माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्यभरात गोंधळ उडाला. सोशल मीडियावर मात्र शेतकऱ्यांनी रणजित डीसले यांना सपोर्ट करत उलट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
युट्युब,फेसबुक,इंस्टाग्राम तसेच इतर मीडियावर रणजित डीसले यांच्या बाजूने कमेंटचा भडिमार सुरू आहे.रणजीत डिसले यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये येऊन परदेशात पीएचडी करण्यासाठी परवानगी मागितली होती मात्र त्यांना कागदोपत्री प्रोसिजर नुसार येण्याच्या सूचना देण्यात आल्या. याच दरम्यान त्यांच्या 2017 ते 2020 दरम्यानच्या प्रतिनियुक्ती वरील वेतनाचा विषय पुढे आला त्याच्या चौकशी अहवालाचा विषय समोर आला त्यामुळे डीसले यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. म्हणून आता त्यांची परदेशवारी थांबणार का? अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली.
शेवटी याची दखल थेट राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना घ्यावी लागली त्यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याशी बोलून डीसले यांच्या परदेशवारीला परवानगी द्या अशा सूचना करून त्यांचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे रणजीत डीसले सुरुवातीला ‘फसले’ नंतर ‘रुसले’ आणि आता ‘हसले’ अशी मजेदार चर्चा आणि असे चित्र दिसून आले. नेमकी जिल्हा परिषदेने याविषयी कोणती भूमिका घेतली होती हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माध्यमांना जोशामध्ये प्रतिक्रिया दिल्याने उलट झेडपीची अडचण झाल्याचं या प्रकरणात पाहायला मिळालं.


















