भाजपच्या ‘रामा’ने योग जुळवला ; विजयराज डोंगरे व बाळराजे पाटील एकाच व्यासपीठावर ; युवकांमध्ये उत्साह
सोलापूर : राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे सरकार आहेत. या युतीमुळे अनेकांचे राजकीय वैर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आता तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांचे विरोधक असणारे अनेक नेते एकाच व्यासपीठावर दिसून येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मात्र कमालच केली आहे. भाजपच्या या रामाने मोहोळ तालुक्यातील पूर्वाश्रमीचे मित्र मात्र नंतर काही घटना आणि प्रकार घडल्याने एकमेकांचे विरोधक झालेल्या दोघा युवा नेत्यांना एकत्र करण्याचा योग जुळवून आणला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळराजे पाटील हे अनेक वर्षानंतर आता एकाच कार्यक्रमात दिसत आहेत, त्यामुळे मोहोळ तालुक्यात डोंगरे आणि पाटील गटात उत्साहाचे वातावरण असल्याचे ऐकण्यास मिळत आहे.
भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा मोहोळ दौरा झाला. अर्जूनसोंड, कोळेगाव, लांबोटी या गावांमध्ये प्रचार दौरा केला या संपूर्ण दौऱ्यात बाळराजे पाटील आणि विजयराज डोंगरे हे सोबतच पाहायला मिळाले त्यामुळे सातपुते यांची मोहोळ तालुक्यात ताकद वाढले असल्याचे चित्र आहे.